10/03/2025
हापूस आंब्यांचे पीक कमी ;
दरात वाढ होण्याची शक्यता
नवी मुंबई :- यंदा हापसू आंब्यांची आवक घटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त हापूस खाता येणार नसल्याची चिन्हे आहेत. एपीएमसी बाजारात यावर्षी हापूस हंगाम सुरळीत राहील अशी अपेक्षा होती; परंतु ऐन फळधारणेच्या कालावधीत हापूसच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
पाऊस, हवामान बदल, तसेच कडाक्याच्या थंडीने हापूस आंब्यांवर परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. यंदा ३५ ते ४० टक्के उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागील वर्षी बाजारात फेब्रुवारी महिन्यात लवकर आवक सुरू झाली होती, तर मार्चमध्ये हंगाम सुरू झाला होता, मार्चमध्ये ४० ते ५० हजार पेट्या दाखल होत होत्या. यावेळी मात्र मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या आंब्यात घट होऊन कमी हापूस दाखल होत आहे. फेब्रुवारीमध्ये एक दिवस आड कोकणातील हापूसच्या पेट्या दखल होत होत्या, तर सध्या बाजारात आता तीन ते साडेतीन हजार पेट्या दाखल होत आहेत. त्यामुळे यावर्षी हापूसचा हंगाम अवघा ३५ ते ४० टक्के आहे. तसेच मे अखेरपर्यंत सुरू असणारा हंगाम लवकर संपुष्टात येणार आहे.
तीन ते चार महिने हापूसचा हंगाम सुरू असतो. यंदा मात्र २० मार्च ते एप्रिल अखेर तसेच काही तुरळक आवक १० मेपर्यंत राहणार असल्याची माहिती एपीएमसीतील फळ मार्केटमधील घाऊक फळ व्यापारी यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात रत्नागिरी, देवगडचा, रायगडचा हापूस दाखल होत असून चार ते सहा डझनाच्या पेटीची तीन हजार ते सहा हजार रुपये दराने विक्री होत आहे. कोकणातून आंब्याच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये दाखल झाल्या आहेत. आंब्यांचे पीक कमी होत असल्याने आंब्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.