23/06/2026
यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा संपन्न.
सिल्लोड, दि. 08 जून 2026 :
यशवंतराव चव्हाण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिल्लोड येथे एनसीसी विभाग व राजर्षी शाहू अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांच्यापासून इतर युवकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पंडित, उपप्राचार्य डॉ. गंगाधर मोरे तसेच एनसीसी कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अग्निवीर आर्मीमध्ये निवड झालेल्या सागर भोसले, गणेश सुरे, वैभव चरवंडे, मयूर हिवाळे, तेजस जंजाळ, यश पंडित, अभिषेक फोलाने, वैभव भोसले, बबलू सोनवणे, दीपक काळे, दत्ता बर्डे, गणेश वराडे, आकाश काळे, अजय काकडे, नागेश समिंद्रे, पवन पालोदकर, वैभव सपकाळ, तुषार बावस्कर, राधेश्याम तंबडे, आदित्य मादणीकर, दीपक मिसाळ आदी विद्यार्थ्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात एनसीसी विभागाचे लेफ्टनंट डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी कामठी (नागपूर) येथे यशस्वीरीत्या रिफ्रेशर कोर्स पूर्ण करून कॅप्टन पदाची प्राप्ती केल्याबद्दल त्यांचाही संस्थेचे सचिव डॉ. राहुल पालोदकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
सन्मानित विद्यार्थ्यांपैकी दीपक काळे व आदित्य मादणीकर यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या यशामागील अथक परिश्रम, नियमित सराव, जिद्द आणि कुटुंबीयांच्या पाठबळाचा उल्लेख केला. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कठोर मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अशोक पंडित म्हणाले की, "यश मिळेपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. अनेक विद्यार्थी रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणि मैदानावर कठोर सराव करून अग्निवीरसारख्या स्पर्धात्मक क्षेत्रात यश मिळवतात. यश अद्वितीय असते. त्यामध्ये आई-वडिलांच्या कष्टांचे चीज आणि त्यांच्या स्वप्नांची पूर्तता दडलेली असते. देशसेवा ही सर्वोच्च सेवा असून अग्निवीर योजना युवकांना कमी कालावधीत देशासाठी योगदान देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देते."
अध्यक्षीय समारोपात डॉ. राहुल पालोदकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, "अग्निवीरमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केवळ त्यांच्या गावापुरता मर्यादित राहू नये, तर तालुकास्तरावर त्यांचा सन्मान व्हावा, अशी माझी संकल्पना होती. यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रेरणेतून इतर युवकांनाही नवी दिशा मिळेल. अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता अधिक जोमाने प्रयत्न करावेत. गरीब कुटुंबातील अनेक मुले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करतात. शिक्षण आणि संधी मिळाल्यास ग्रामीण भागातील युवकही देशाच्या सेवेत मोठे योगदान देऊ शकतात."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन डॉ. ज्ञानेश्वर गवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ज्ञानेश्वर शेजुळ यांनी तर आभार ज्ञानेश्वर हिलाले यांनी केले.
या प्रेरणादायी कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.